बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने या दीपावलीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, कारण याआधी कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञ समितीने वर्तविली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याचे निर्देश जरी केले आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारने ग्रीन क्रॅकर्स संकल्पनेवर अधिक स्पष्टता आणण्याचा आदेश जारी केला आहे. गेल्या आठवड्यात दिवाळीपूर्वी ग्रीन क्रॅकर्स राज्यव्यापी बंदीपासून मुक्त करण्यात आले होते.
महसूल विभागाचे प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) अंजुम परवेझ यांनी जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार, सीएसआयआर-नीरी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था) आणि पीईएसओ (पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था) च्या ग्रीन लोगोद्वारे क्यूआर कोडसह उर्वरित ग्रीन क्रॅकर्स ओळखले जाऊ शकतात. बनावट उत्पादनांची निर्मिती व विक्री टाळण्यासाठी फटाक्यांवरील क्यूआर कोड ही एक नवीन कल्पना आहे.
आदेशात असे नमूद केले आहे की स्पार्कलर्स, फ्लॉवरपॉट्स आणि मरून यासह ग्रीन क्रॅकर्स विविध प्रकारात उपलब्ध आहेत. दरम्यान ग्रीन क्रॅकर्समध्ये हानिकारक रसायने नसतात, त्यामुळे फटाक्यांमुळे वायूप्रदूषण कमी होते. पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत हे फटाके कमी हानिकारक आहेत, आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, राज्यातील पोलीस दलाने या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आणि फक्त “ग्रीन” प्रकारात मोडणाऱ्या फटाक्यांची विक्री करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.