बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना मदत पॅकेज अंतर्गत रोख मदतीचे वितरण सुरू झाले असून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी सांगितले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यात २७ एप्रिलपासून १४ जूनपर्यंत कर्फ्यू आणि लॉकडाऊन लागू केला आहे. दरम्यान कोरोना साथीच्या काळात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. दोन हप्त्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या १,७५० कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा मुख्यमंत्र्यांनी संदर्भ देत या मदत पॅकेजचे वितरण सुरु असल्याचे सांगितले. तसेच लाभार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आज आम्ही कर्नाटक इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे ७४९.५५ कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत असे सांगितले. त्यामुळे २५ लाख नोंदणीकृत कामगारांना ३ हजार रुपये मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.