बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने कोविड कर्तव्यासाठी राज्यातील वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग अभ्यासक्रम शिकणाऱ्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख असलेले उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सेवेसाठी प्रोत्साहनही दिले जाईल, असे म्हंटले आहे.
“इंटर्नर्स, पीजी, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह तब्बल १७,७९७ वैद्यकीय विद्यार्थी त्यांच्या अंतिम पोस्टिंगच्या भागाच्या रूपात राज्यभरातील कोविड कर्तव्यासाठी तैनात असतील. नर्सिंग विभागात ४५,४७० विद्यार्थी असून, डेंटल २,५३८, आयुष ९,६५४ आणि फार्मसी ९,९३६ अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सेवा घेण्यात येईल. आमच्याकडे जवळपास ४० हजार संबंधित विद्यार्थी देखील संबंधित प्रवाहात आहेत, “असे त्यांनी अधोरेखित केले आहे.
दरम्यान, अश्वथनारायण यांनी, “यापुढे या एक लाख लोकांसह आमच्या वैद्यकीय कर्मचार्यांची संख्या अधिक बळकट होईल. हे विद्यार्थी रुग्णालयांच्या मागणीच्या आधारे तैनात केले जातील आणि त्यांना प्रोत्साहनपर सुविधा पुरविण्यात येतील. ”
टास्क फोर्सने असेही म्हटले आहे की “कोणत्याही निर्बंधाशिवाय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील इंटर्नर्स बदलण्यास परवानगी देण्यात येईल,” असे समितीने नमूद केले.
गेल्या आठवड्याच्या सुरूवातीस, हृदयविकार शल्य चिकित्सक डॉ. देवी शेट्टी यांनी असा इशारा दिला होता की, कोविड रुग्ण देशभरात ज्या ऑक्सिजनच्या समस्येचा सामना करत आहेत तो एकदा सोडवला गेला तर पुढचे मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स यांची कमतरता, असे त्यांनी म्हंटले आहे.