मंगळूर/प्रतिनिधी
एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे खतरनाक झिका विषाणूमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. केरळ कर्नाटक सीमा लागून असल्याने कर्नाटक सरकारने केरळच्या सीमेवरील भागात पोलिसांनी दक्षिण कन्नड येथे सहा चौक्या उभारल्या आहेत. मंगळूरचे पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) हरिराम शंकर यांच्या म्हणण्यानुसार, थालापाडी येथील चेकपोस्टशिवाय, ताऊदुगोळी, नेट्टीलापाडव, नर्या क्रॉस, नंदर पाडपू आणि मुद्दुगरा कट्टे येथे पाच अतिरिक्त चेकपोस्ट स्थापन करण्यात येतील, असे म्हंटले आहे.
“वैद्यकीय पथकासह चेकपोस्टवर तीन शिफ्टमध्ये पोलीस कर्मचारी तैनात केले जातील. कर्नाटकमधील एसएसएलसी परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आरटी-पीसीआर चाचणी घेतल्यानंतर फारसा विलंब न करता प्रवेश घेता येईल,” असे ते म्हणाले.
दरम्यान डीसीपी पुढे म्हणाले की, राज्यात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर १४ दिवसांत एकदा नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल सादर करण्यास सांगितले जाईल. “हाच नियम कर्मचार्यांसाठी, व्यवसाय करणार्या लोकांसाठी आणि दररोज केरळ आणि मंगळूर दरम्यान वारंवार येणाऱ्या लोकांसाठीही असेल. यावेळी कोणी कोरोना सकारात्मक आढळल्यास केरळ सरकार त्यांना अलिप्त ठेवण्यास सतर्क करेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.