शिवमोगा/प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट असताना कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण समाज एकत्र आला आहे, पण राज्यातील काँग्रेस नेते राजकीय फायद्यासाठी सरकारवर आरोप करीत आहेत, तसेच काँग्रेसला पुढील निवडणुकीपर्यंत कोरोना जिवंत ठेवायचा आहे, असे जिल्हा प्रभारी मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी म्हंटले आहे.
शिवमोगा येथे पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आणि जिल्हा प्रभारी मंत्री के. एस. ईश्वरप्पा म्हणाले की, राज्यातील सर्व आमदार, एमएलसी, खासदार, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी कोरोनाचा प्रसार आणि मृत्यू कमी करण्यासाठी कसलीही कसर सोडत नाहीत. “आम्ही याकडे दुर्लक्ष केले नाही. सरकारला विधायक सूचना देण्याऐवजी कॉंग्रेसचे विधानसभेचे नेते सिद्धरामय्या आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार सरकारवर आरोप करीत आहेत. काँग्रेसला कोरोना पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवायचे आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ईश्वरप्पा म्हणाले, शिवमोगा जिल्ह्यातील अनेक औषध कंपन्या या क्षेत्रातील त्यांच्या मित्रांकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पैसे दिले आहेत. पण कॉंग्रेस नेत्यांनी सरकारवर दोषारोप सुरू ठेवले आहेत.









