बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत सर्वत्र साधेपणाने सण साजरे केले गेले. आता दिवाळी असल्याने आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने देशात घरच्या घरी दिवाळी साजरी करा असे प्रशासनाने म्हंटले आहे. दरम्यान कोरोनामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसआरटीसी कर्मचारी पगार ना झाल्याने नाराज आहेत. चार राज्यात रस्ते वाहतूक महामंडळात (एसआरटीसी) कार्यरत असणारे सुमारे दीड लाख कर्मचार्यांना वेळेवर पगार मिळालेला नाही.
दरम्यान केएसआरटीसी युनियनने राज्य सरकारला पगाराच्या किमान काही रक्कम देण्याची मागणी केली होती, जेणेकरून कर्मचारी दिवाळी साजरी करू शकतील. परंतु कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केलेली नाही. शनिवारी वेतन मंजूर झाले नसल्याने कर्मचार्यांना मंगळवारपर्यंत पगार मिळणार नाही, तोपर्यंत बँका बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारानंतरच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. एसआरटीसीने डिसेंबरपर्यंत पगार देण्यासाठी सरकारला ६३४ कोटी रुपये देण्यास सांगितले होते.
पगार होणार नसल्याने केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मार्चपूर्वी कर्मचार्यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार मिळत असे. परंतु आता, आम्हाला दरमहा 15 ते 20 तारखेदरम्यान पगार दिला जातो. आम्हाला कुटुंब आहे व इतर खर्च देखील आहे. त्यामुळे खर्चासाठी म्हणून आम्ही मित्र आणि वित्तपुरवठा करणार्यांकडून कर्ज घेत आहोत, असा संताप काही जणांनी व्यक्त केला आहे.









