बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांना कोविड -१९ टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. तर राज्यस्तरीय कोविड -१९ टास्क फोर्समध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार, माहिती व जनसंपर्क मंत्री सी. सी. पाटील आणि आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर हे सर्व सरकारच्या आदेशानुसार टास्क फोर्समध्ये असतील. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच कोविड -१९ मधील नियंत्रण आणि व्यवस्थापन उपायांचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.
दरम्यान मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना टास्क फोर्सची स्थापना झाली. त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू, के. सुधाकर, अश्वथ नारायण, गृहमंत्री बसवराज बोम्माई आणि तत्कालीन मुख्य सचिव टी. एम. एम. भास्कर हे टास्क फोर्स मध्ये होते.
दरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचे अधिकार देण्यात आले. टास्क फोर्सच्या प्रमुखपदी उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद करजोल यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण त्यांची जागा घेतील.