बेंगळूर/प्रतिनिधी
मादक पदार्थ प्रकरणी कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिला सीसीबी पोलिसांनी समन्स बजावला होता. तिला गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पण अभिनेत्री रागिनी गुरुवारी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) अधिकाऱ्यांसमोर येऊ शकली नाही. त्याऐवजी रागिनीचे प्रतिनिधित्व करणार्या वकीलांची एक टीम सीसीबीसमोर हजर झाली.
चित्रपट निर्माते आणि पत्रकार इंद्रजित लंकेश यांनी नुकताच ड्रग्स प्रकरणाबाबत वक्तव्य केल्यानंतर सीसीबी कन्नड चित्रपटातील कलाकारांकडून मादक पदार्थांचे व्यवहार आणि मादक पदार्थांच्या गैरवापराबाबत चौकशी करत आहे. रागिणी आणि तिचा मित्र रविशंकर यांना गुरुवारी चामराजपेट येथील सीसीबी मुख्यालयात हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. पण त्या हजर झाल्या नाहीत.
रागिणी यांनी मी आज सीसीबी पोलिसांसमोर हजर होऊ शकले नाही. तथापि कायद्याच्या प्रक्रियेबद्दल आदर आहे. माझ्या वकीलांनी पोलिसांसमोर म्हणणे मांडले आहे, आज हजर न राहण्याची माझी अडचण स्पष्ट केली आहे. मी पोलिसांसमोर हजर होणार असून सोमवारी सकाळी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्यास वचनबद्ध आहे, असे रागिनी यांनी गुरुवारी ट्विट करत माहिती दिली आहे.
२१ ऑगस्ट रोजी, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना ड्रग्स पुरवठा करणार्या मोठ्या टोळीला अटक केली होती.
इंद्रजित लंकेश यांनी सोमवारी कन्नड फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्सच्या पार्ट्या होत असल्याचा दावा केला होता. या दाव्यावरून लंकेश सीसीबी पोलिसांसमोर बुधवारी हजर झाले. लंकेश यांची जवळपास पाच तासांपर्यंत चौकशी केली गेली, कारण लंकेश यांनी या उद्योगातील बरेच जण ड्रग्स घेत आहेत, असा दावा केला आहे.