बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्नाटकला मिळणाऱ्या कोरोना लसीच्या डोसचे वाटप दरमहा ६५ लाखांवरून १ कोटी पर्यंत वाढवण्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी सांगितले.
म्हैसूरमध्येकोरोना परिस्थितीचा आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी, कर्नाटकला सध्या दरमहा सरासरी ६५ लाख डोस मिळत आहेत. जेव्हा त्यांनी दिल्लीच्या दौऱ्यादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली आणि वाटपात वाढ करण्याची मागणी केली, तेव्हा त्यांना आश्वासन देण्यात आले की कर्नाटकला ऑगस्टपासून एक कोटी डोस मिळतील.
दरम्यान, बोम्माई यांनी केंद्राला सप्टेंबरपासून १.५ कोटी डोसचे वाटप वाढवण्याची विनंती केली, ज्यामुळे राज्यभरात दररोज ५ लाख डोस देण्यास सुलभ होईल. राज्यात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग वाढेल आणि लवकर लसीकरण पूर्ण होईल.