बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या शेजारील राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. केरळ राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटकात रुग्ण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने कर्नाटकात येणाऱ्या नागरिकांना कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक केला आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोना संसर्गाची १,७६९ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर १,७१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर याचवेळी कोरोनामुळे ३० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बुधवारी, राज्यातील कोरोनाची सक्रिय प्रकरणे वाढून २४,३०५ झाली.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली आहेत, जिथे नवीन संक्रमित लोकांची संख्या ४११ आहे. त्याच वेळी, किनारपट्टीच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. बुधवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात ३५० नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तसेच चिक्कमंगळूरमध्ये ६७, हसन जिल्ह्यात११२, कोडगू जिल्ह्यात ९९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.









