बेंगळूर/प्रतिनिधी
लसीच्या तीव्र टंचाईचा परिणाम देशावर झाला असल्याने कर्नाटकात कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक-व्ही या दोन कोविड लस तयार होणार आहेत. कर्नाटकात याआधी कोव्हॅक्सिनचे उत्पादन होणार असल्याचे सांगितले होते. आता स्पुतनिक-व्हीचे उत्पादन होणार आहे.
दरम्यान, कोलार जिल्ह्यातील मालूर येथे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस तयार करण्यात येणार आहे. तर शिल्पा बायोलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेड (एसबीपीएल) धारवाडमधील आर अँड डी सुविधा येथून स्पुतनिक-व्ही तयार करेल अशी अपेक्षा आहे.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांच्या म्हणण्यानुसार, भारत बायोटेकने ऑगस्टच्या अखेरीस सुमारे पाच कोटी कोव्हॅक्सिन डोस तयार करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस दरमहा 1 कोटी डोसची गती असणार आहे.
दरम्यान, एसबीपीएलने म्हटले आहे की पहिल्या 12 महिन्यांकरिता स्पुतनिक-व्हीचे उत्पादन सुरूवातीस 5 कोटी डोस असणार आहे.









