बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्ण वाढीचा वेग थांबताना दिसत नाही. राज्यात गुरुवार पेक्षा शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ७,५४२ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नेहमीप्रमाणे बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले. बेंगळूर जिल्ह्यात ३,४४१ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे शुक्रवारी कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात ८,५८० रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी राज्यात एकूण ७३ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी २४ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १०,३६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









