बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोनाचा कहर शनिवारीही कायम होता. राज्यात बाधितांची सांख्य वाढतच आहे. वाढत्या रूग्णांबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात चोवीस तासात ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर राज्यात शनिवारी २४ तासात ४७,५६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यासह कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५,४८,८४१ इतकी झाली आहे. राज्यात कोरोना सकारात्मकतेचा दर ३०.२८ टक्क्यांपर्यंत वाढला. शनिवारी राज्यात कोरोनावर मात कररणाऱ्या रुग्णांची संख्या ३४,८८१ इतकी होती. तर विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४८२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार शनिवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १८,२८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात २१,५३४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १८,४७३ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. जिल्ह्यात चोवीस तासात २८५ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे.









