बेंगळूर/प्रतिनिधी
देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरु आहे. दरम्यान, कर्नाटकात लवकरच कोलार जिल्ह्यात भारत बायोटेकचा कोव्हॅक्सिन उत्पादक प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी शुक्रवारी सांगितले.
बांधकामाचे काम यापूर्वीच सुरू झाले असून सरकारने गुंतवणूकदारांना राज्यात लस तयार करण्यासाठी आमंत्रित केले आहे, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री आणि राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख असलेले अश्वथ नारायण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत बायोटेकचा कोव्हॅक्सिन लस उत्पादक प्रकल्प शेजारच्या कोलार जिल्ह्यातील मलूर औद्योगिक क्षेत्रात लवकरात लवकर स्थापित केला जाईल.”
राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि कंपनी प्रशासकीय आवश्यकतेवर प्रक्रिया करीत आहे. बांधकामांची कामे आधीच सुरू केली गेली आहेत आणि लस उत्पादन कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हे काम लवकरच पूर्ण केले जाईल,” असे ते म्हणाले.
त्यांच्या मते, राज्याच्या राजधानीपासून जवळच असलेल्या मलूरमध्ये वाहतुकीच्या चांगल्या सुविधा आहेत. ते म्हणाले की लस उत्पादनात गुंतलेल्या कोणत्याही कंपनीचे राज्य स्वागत व पूर्ण सहकार्य करेल.









