बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज ५० हजार पर्यंत कोरोना रुग्ण सापडत होते. परंतु राज्यात सोमवारी आणि मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसली. मंगळवारी राज्यात ३९,५१० जणांना कोरोना संक्रमणाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्याच वेळी, २२,५८४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर राज्यातील विविध जिल्ह्यात ४८० रुग्ण मरण पावले आहेत. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ५,८७,४५२ इतकी आहे.
मंगळवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण ३३.९९ टक्के होते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १५,८७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी ५,३७८ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तर जिल्ह्यात मंगळवारी २५९ संक्रमितांचा मृत्यू झाला.









