बेंगळूर/प्रतिनिधी
कनाटक सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केल्यांनतर आता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने कोरोना चाचणी सकारात्मकतेचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या प्रदेशांमध्ये ६ सप्टेंबरपासून पर्यायी दिवशी ६ वी ते ८ वीच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले की शनिवार आणि रविवार सुटी असल्याने पर्यायी दिवशी, अर्ध्या दिवसासाठी ५० टक्के क्षमतेने शाळा पुन्हा उघडल्या जातील.
सरकारने यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी नववी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. २३ ऑगस्टपासून सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती होती, परंतु अनेक खाजगी शाळा अद्याप बंद आहेत. दरम्यान, “मुलांच्या ६,४७२ नमुन्यांपैकी फक्त १४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण खूपच कमी आहे आणि म्हणूनच आम्ही राज्यात इतर वर्गांसाठी ऑफलाइन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, ” असे अशोक म्हणाले.