सुरक्षा घेरा तोडल्याचा व्हिडिओ व्हायरल; संबंधिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत शनिवारी हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. दावणगेरेमध्ये भाजपच्या विजय संकल्प यात्रेच्या समारोप समारंभात पंतप्रधान मोदी रोड शोमध्ये सहभागी झाले असताना एका व्यक्तीने सुरक्षेचा घेरा तोडत तो पंतप्रधानांच्या दिशेने धावला. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून संबंधिताची चौकशी सुरू आहे. दोन महिन्यांत पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कर्नाटकातील हुबळी भागात त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या होत्या. गेल्याच महिन्यात युवा महोत्सव उद्घाटनासाठी पंतप्रधान हुबळी येथे पोहोचले होते.
दावणगेरे येथे पंतप्रधानांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटींचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी समर्थक ‘पंतप्रधान मोदी जिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीने मोदींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. संबंधित व्यक्ती धावत पंतप्रधानांच्या गाडीच्या दिशेने धावत आहे. याचदरम्यान तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. यानंतरही ते पंतप्रधानांकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.









