बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येमुळे राज्यांत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजन पुरावठा केला जात आहे. केंद्राकडून कर्नाटकाला आतापर्यंत तीन ऑक्सिजन एक्स्प्रेसने ऑक्सिजन पुरवठा केला आहे. दरम्यान, मंगळवारी चौथी ऑक्सिजन एक्स्प्रेस बेंगळूरमध्ये दाखल झाली.
सोमवारी झारखंडमधील टाटानगर येथून मेडिकल ऑक्सिजन घेऊन निघालेली चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी बेंगळूरला पोहोचली. ही ऑक्सिजन एक्स्प्रेस “सकाळी ४.४५ वाजता १२० मे.टन ऑक्सिजन घेऊन बेंगळूरला पोहोचली. या ट्रेनमध्ये १२० टोनेस एलएमओ (द्रव वैद्यकीय ऑक्सिजन) असलेले सहा क्रायोजेनिक कंटेनर होते,” अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेने दिली आहे. यासह झारखंड आणि ओडिशा येथून एकूण ४८० मे.टन ऑक्सिजन कर्नाटकात आला आहे.