बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी कमी होत आहे. राज्यात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सातत्याने कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. शनिवारी राज्यात १४ हजारपेक्षा कमी रुग्णांची भर पडली. तर २५ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले.
दरम्यान शनिवारी राज्यात १३,८०० नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली, तर २५,३४६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. यासह राज्यात सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या २,६८,२७५ वर पोहोचली आहे. तर शनिवारी कोरोना संसर्गामुळे ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण ९.६९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे २,६८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. याचवेळी ८,८५२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर जिल्ह्यात २०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.