बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना प्रसाराचा वेग वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असू शकते असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात दिवसागणिक वाढणारी कोरोनाची संख्या चिंता वाढवणारी आहे. कर्नाटकात सुमारे पाच महिन्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कर्नाटकात पहिल्यांदाच एकाच दिवसात ५ हजार रुग्ण आढळले होते आणि ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण आढळत आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ४२ हजाराहून अधिक रुग्ण उपचारात आहेत. राज्यात २४ तासांत ५ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान राज्यात सोमवारी ५,२७९ बाधितांची नोंद झाली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णालयातून १,८५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ३२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कर्नाटकात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ४२,१३८ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे एकूण १२,६५७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बाधितांही सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. सोमवारी जिल्ह्यात ३,७२८ जणांना कोरोनाची लागण झाली. तर १०२६ रुग्ण यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत ४,६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









