बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट नवीन उसळी घेते आहे. राज्यात बुधवारी बाधितांच्या संख्येत वाढ झाली. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी कोरोनाने ७ हजारापर्यंत मजल मारली. राज्यात गेल्या २४ तासात ६,९७६ कोरोनाबाधितांची भर पडली. तर राज्यात गेल्या चोवीस तासात ३५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी २,७९४ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले ही दिलासा देणारी बाब आहे.
राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या ४९,२५४ वर गेली आहे. आतापर्यंत एकूण १०,३३,५६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी ९,७१,५५६ रुग्णांनी कोरोनाला पराभूत केले आहे. राज्यात कोविड संसर्गामुळे एकूण १२,७३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्याचा सकारात्मकता दर ५.५६ टक्के होता.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्हा सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारा जिल्हा आहे. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पोहोचली आहे. बुधवारी जिल्ह्यात ४,९९१ बाधितांची नोंद झाली. तर १,७८२ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,७१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.