दोन तृतीयांश बहुमत; भाजपला 65 जागा, बोम्माई विजयी, मात्र 12 मंत्र्यांना फटका : शेट्टरांनाही धक्का
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभेच्या सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाने बाजी मारून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे स्वबळावर शंभर नंबरी विजय मिळवून निधर्मी जनता दलाचे ‘किंगमेकर’ होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. मुख्यमंत्री बोम्माई सहजपणे यशस्वी झाले. मात्र, बारा मंत्र्यांना पराजय पत्करावा लागला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनाही मतदारांनी झिडकारले. भारतीय जनता पक्षातून बाहेर पडत काँग्रेसची उमेदवारी त्यांनी मिळवली होती. सलग नऊवेळा यशश्री संपादन करण्याचा बहुमान आर. व्ही. देशपांडे यांना लाभला. या निकालाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले.

मतदारांचा कौल आपल्याला मान्य असून पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारल्याचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी जाहीर केले. ‘हमने मोहब्बत से नफरतको हराया’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘गॅरंटी’ योजनांना मंजुरी देण्यात येईल, असा पुनरुच्चार केला. दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज बेंगळूर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सत्ताविरोधी लाटेदरम्यान राज्यात 224 पैकी 136 जागांवर काँग्रेसने विजयी मोहोर उमटविली आहे. 35 वर्षांनंतर राज्यात काँग्रेसला इतका मोठा विजय मिळाला आहे. विरेंद्र पाटील यांच्या कालावधीत काँग्रेसला असे यश मिळाले होते. सत्ताधारी भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर निजदच्या जागांमध्ये 19 वर घसरण झाली आहे. दोन अपक्षांसह सर्वोदय कर्नाटक पक्षाला एक आणि माजी मंत्री जनार्दन रे•ाr यांच्या स्वरुपात कल्याण राज्य प्रगती पक्षाने एक जागा मिळविली आहे.
मतमोजणीनंतर दीड तासात ट्रेंड स्पष्ट
सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला आणि दीड तासातच ट्रेन्ड स्पष्ट झाला. दुपारी 12 वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांनी बाल्कनीमध्ये येऊन काँग्रेसचा झेंडा फिरविला तर कार्यकर्त्यांसमोर हात जोडले. पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाले आणि आनंदाश्रू तरळले. मी कारागृहात असताना सोनिया गांधी मला भेटण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना कर्नाटकात पक्ष सत्तेवर आणणारच असा निर्धार व्यक्त केला तो आता पूर्ण होत आहे, असे ते म्हणाले. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री बोम्माई यांनी आपण पराभव स्वीकारल्याचे मान्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले. दुपारी अडीचच्या सुमारास राहुल गांधी पत्रकारांना सामोरे गेले. त्यांना अभिवादन केले आणि म्हणाले, “हमने नफरतसे लडाई नही की.” असे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या लढती…
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी चिन्नपट्टणमधून विजयी झाले. मात्र, त्यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी पराभूत झाले. शिमो जिल्ह्यात येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनी सहज विजय मिळविला. याच जिल्ह्यातील सोरब मतदारसंघात चौथ्यांदा एकमेकांविरुद्ध लढणारे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र मधु बंगारप्पा आणि कुमार बंगारप्पा यांच्यात मधू सरस ठरले. त्यांनी 13 हजार मतांनी भाजप उमेदवार कुमार बंगारप्पा यांचा पराभव केला. मधू काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात होते. येडियुराप्पांचे राजकीय सचिव एन. आर. संतोष हे भाजपमधून अरसीकेरे मतदारसंघात होते. त्यांना काँग्रेस उमेदवार के. एम. शिवलिंगेगौडा यांनी पराभूत केले. शिवलिंगेगौडा यांनी निजदमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर एन. आर. संतोष यांना भाजपने तिकिट नाकारल्यामुळे ते निजदमधून रिंगणात होते.
अपक्ष आणि इतर पक्षाचे उमेदवार विजयी
गौरीबिदनूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पुट्टस्वमीगौडा आणि हरप्पनहळ्ळी येथून लता मल्लिकार्जुन यांनी विजय मिळविला आहे. लता मल्लिकार्जुन यांना काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. त्या दिवंगत माजी उपमुख्यमंत्री एम. पी. प्रकाश यांच्या कन्या होत. त्याचप्रमाणे कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक आणि याच पक्षातील गंगावतीचे उमेदवार जनार्दन रे•ाr यांनी राज्यातील तिन्ही पक्षाच्या उमेदवारांवर पराभूत केले आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसने आपल्या पक्षाचा उमेदवार न देता सर्वोदय कर्नाटक पक्षाचे उमेदवार दर्शन पुट्टणय्या यांना पाठिंबा दिला होता. दर्शन यांनी भाजप उमेदवारावर मात केली आहे.
निजद, भाजपच्या मतदारसंघांवर काँग्रेसचा ताबा
दक्षिण कर्नाटकावर अधिक लक्ष केंद्रीत केलेल्या भाजपच्या हाती फारसे काही लागले नाही. जुन्या म्हैसूर भागात काँग्रेस-निजदमध्येच लढती रंगल्या. त्यात काँग्रेस वरचढ ठरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये निजदला जागा गमवाव्या लागल्या. रामनगर, मंड्या, म्हैसूर, या जिल्ह्यात भाजपच्या जागांमध्ये घसरण झाली. तर भाजपला कोडगू, चिक्कमंगळूर, रामनगर, कोलार आणि मंड्या यासह 8 जिल्ह्यांमध्ये एकही जागा मिळविता आलेली नाही. तर आठ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 आणि सात जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन जागा मिळविता आल्या आहेत. उडुपी जिल्ह्यातील पाचही जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे.
बेंगळूरमध्ये भाजपला 15 तर काँग्रेसला 13 जागा
बेंगळूरमध्ये भाजप उमेदवारांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, सत्ताविरोधी लाटेत भाजपला 28 पैकी 15 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 13 जागा मिळविता आहे. निजदने यापूर्वी असणारी एक जागा गमावली आहे. या पक्षाला बेंगळूरमध्ये एकही जागा मिळविता आलेली नाही.
मुख्यमंत्री निवडीचा निर्णय हायकमांडवर सोपविणार
काँग्रेसच्या विजयानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल व इतर प्रमुख नेत्यांनी बेंगळूरमधील काँग्रेसच्या कार्यालयात अनौपचारिक चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. रविवारी सायंकाळी 5:30 वाजता काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या बैठकीत विधिमंडळ नेता (मुख्यमंत्री) निवडीचा निर्णय हायकमांडवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. बैठकीसाठी हजर होण्याची सूचना पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांना देण्यात आली आहे. शिवाय मुख्यमंत्रिपदाविषयी कोणीही वाच्यता करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.

बोम्माई यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
भाजपला निवडणुकीत पराभूत व्हावे लागले असून बसवराज बोम्माई यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी रात्री 9:30 वाजता बोम्माई बेंगळूरमधील राजभवन येथे दाखल झाले. त्यांनी आपले राजीनामापत्र राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. निवडणुकीत झालेल्या चुका आम्ही दुरुस्त करू, असे सांगितले. बोम्माई यांनी 19 महिने 17 दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सांभाळला आहे
पराभूत मंत्री
विश्वेश्वर हेगडे-कागेरी
गोविंद कारजोळ
बी. श्रीरामुलू
आर. अशोक (कनकपूर)
हालप्पा आचार
डॉ. के. सुधाकर
बी. सी. पाटील
मुरुगेश निराणी
बी. सी. पाटील
जे. सी. माधुस्वामी
व्ही. सोमण्णा
एम. टी. बी. नागराज
विजयी मंत्री
बसवराज बोम्माई
प्रभू चौहान
डॉ. सी. एन. अश्वथ नारायण
शशिकला जोल्ले
एस. सुरेशकुमार
आर. अशोक (पद्मनाभनगर)
एस. टी. सोमशेखर
व्ही. सुनीलकुमार
भैरती बसवराज
मुनिरत्न
के. गोपालय्या
आजी-माजी सभाध्यक्ष पराभूत
विश्वेश्वर हेगडे-कागेरी (भाजप)
रमेशकुमार (काँग्रेस)
के. जी. बोपय्या (भाजप)









