बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट कमी कमी होत आहे. देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तसेच या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी हावेरी जिल्ह्यात तयारी सुरु झाली आहे. देशातील हावेरी हा पहिलाच जिल्हा असेल जो पहिल्यांदाच तिसर्या लहरीला सामोरे जाण्याच्या तयारीचा भाग म्हणून १६ वर्षांखालील मुलांसाठी एक महिन्यासाठी व्यापक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करत आहे, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई दिली आहे.
कोरोनाच्या तिसर्या संभाव्य लहरीचा सामना करण्यासाठी देश आतापासून सतर्क आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेवरमात करण्यासाठी तयारी सुरू करणारा कर्नाटकचा हावेरी जिल्हा पहिला जिल्हा ठरला आहे. गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी माध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, हावेरी कर्नाटकातील पहिला जिल्हा झाला आहे, जो कोविडच्या तिसर्या लाटेवर मात करण्यासाठी यापूर्वी तयारी सुरू केली आहे.
शिबिरामध्ये २.७ लाख मुलांचा सहभाग
हावेरीचे प्रभारी मंत्री बोम्माई म्हणाले की, तिसर्या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही सार्वजनिक रोग किंवा कुपोषित मुलांची तपासणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी शिबिरे आयोजित करीत आहोत. ही शिबिरे ३१ जुलैपर्यंत चालतील आणि या शिबिरांमध्ये २.७ लाख मुले सहभागी होतील. तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीशिवाय बालरोग तज्ञांकडूनही मुलांची चाचणी घेण्यात येणार आहे.
या मोहिमेविषयी बोलताना बोम्माई म्हणाले की कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून ते संपूर्ण कर्नाटकमध्ये ही मोहीम राबविण्याच्या विचारात आहेत. २८ जून रोजी उडुपी येथे एका शिबिराचे उद्घाटन करणार असल्याचे ते म्हणाले.









