कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये मारुति मसालाने चार दशकांपूर्वी महिलांना रोजगार देण्यासाठी मसाला फॅक्ट्रीची सुरुवात केली होती. या फॅक्ट्रीची सुरुवात 1979 मध्ये एच. लक्षम्मा या निरक्षर महिलेने केली होती. केवळ कच्चे मसाले नव्हे तर यात आणखीन काही तरी समाविष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांचे मानणे होते. स्वतःच्या छोटय़ा घरातून लक्षम्मा यांनी 20 हजार रुपयांच्या भांडवलातून मसाले विक्रीची सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची फॅक्ट्री मध्य कर्नाटकातील सर्वात मोठी मसाला निर्मिती कंपनी ठरली आहे. येथे आता अत्याधुनिक यंत्रे असून त्यांची हाताळणी महिलाच करत असतात.

येथील अनेक महिला लक्षम्मांसोबत तीन दशकांपासून काम करत आहेत. या महिलांच्या मेहनतीमुळेच फॅक्ट्रीचे काम वाढले आहे. महिला प्रत्येक काम गांभीर्याने करत असल्याने फूड वेस्टेज कमी होण्यास मदत झाली आहे. या मसाला फॅक्ट्रीची उत्पादने समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचतात.









