बेंगळूर : प्रतिनिधी
कर्नाटकच्या महाविद्यालयात ‘हिजाब’ परिधान केल्याबद्दल निर्माण झालेला वाद राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये पसरला आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज आणि शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती येथील एम. विश्वेश्वरैया सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी ‘हिजाब विरुद्ध भगवा शाल’ हा मुद्दा समोर आला. या वादामुळे शिक्षण विभाग तसेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंत निर्माण झाली आहे.
कुंदापूर प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या 27 मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात गेल्यानंतर हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून वर्गात आले. शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती येथील एम. विश्वेश्वरैय्या सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारातही बुधवारी हिंदू विद्यार्थ्यांनी भगव्या शाल घालून मुस्लिम विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केल्याचा निषेध केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या वादावर भाजपचे स्थानिक आमदार हलादी श्रीनिवास शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक झाली. पण या वादावर एकमत होऊ शकले नाही.
आमदार शेट्टी यांनी राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी.नागेश यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली त्यानंतर शिक्षणमंत्री नागेश यांनी महाविद्यालयीन अधिकाऱ्यांना विद्यार्थी केवळ गणवेशातच वर्गात येऊ शकतात आणि हिजाब किंवा भगवी शाल परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात सांगितले. गणवेश संहिता 2010 पासून लागू असल्याचे महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना केवळ गणवेशातच वर्गात येणे अनिवार्य आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना हिजाब बदलण्यासाठी आणि गणवेशात वर्गात येण्यासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली आहे.
वर्गात विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अहवाल सादर होईपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना हिजाब न घालता गणवेशात वर्गात जाण्यास सांगितले आहे. दरम्यान, राजकीय विकासाला जातीय वळण लागून शैक्षणिक वातावरण धोक्यात येत आहे.