प्रतिनिधी/ दापोली
महाराष्ट्रात वादळी वारा व पावसाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोकणातील सर्व नौका सध्या सुरक्षित बंदर व खाडय़ांमध्ये विसावल्या आहेत. याचा गैरफायदा घेत कर्नाटक राज्यातील फास्टर नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत व हर्णे समुद्रात धुमाकूळ घालत आहेत. त्यांना तत्काळ अटकाव करण्यात आला नाही तर येथील कोळी बांधव पेटून उठेल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दापोली पंचायत समितीचे माजी सभापती रउफ हजवानी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला आहे.
ते म्हणाले की, आम्ही शासनाचे सर्व नियम पाळतो. यामुळे शासनाने जेव्हा वादळसदृश परिस्थिती असल्याने समुद्रात जाऊ नका, असा इशारा दिला तेव्हा आमच्या सर्व होडय़ा आम्ही किनाऱयावर आणल्या. यामुळे समुद्रात महाराष्ट्रातील एकही बोट नव्हती. याचा गैरफायदा उठवत कर्नाटक बेंगलोर येथील फास्टर मासेमारी बोटी महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱयावर बेकायदेशीरपणे दाखल झाल्या आहेत. या नौकांनी सध्या अरबी समुद्रामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोकणातील मच्छीमारांच्या नौका या किनाऱयाला असल्यामुळे आम्ही परराज्यातील बोटींच्या वेगवान बोटीचा पाठलाग करू शकत नाही. शिवाय त्यांना रोखणे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, हे शासनाचे काम आहे. आम्ही शासकीय अधिकाऱयांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली आहे. तरीही आपल्याकडे स्पीडबोटी नसल्याचे कारण पुढे करत शासकीय अधिकाऱयांनी हात झटकले आहेत. याचा आपण तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. शासनाने परराज्यातील या बोटींना तत्काळ अटकाव केला नाही व त्यांच्यावर कडक कारवाई केली नाही तर कोकणातील मच्छीमार पेटून उठेल व भर समुद्रात संघर्षाचे वातावरण निर्माण होईल, असा इशाराही हजवानी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला आहे. बेकायदेशीरपणे अरबी समुद्रात मासेमारी करणाऱया या बोटींवर शासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









