बेंगळूर/प्रतिनिधी
लसीच्या कमतरतेमुळे राज्यात लसीकरणाची गती संथ झाली आहे. आरोग्य विभागाने राज्यातील उपलब्ध कोव्हॅक्सिन डोसच्या कमतरतेची माहिती दिली होती. माहिती दिल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर मंगळवारी राज्याला आणखी १.२५ लाख डोस मिळाले आहेत.
कर्नाटकला आज केंद्राकडून कोव्हॅक्सिनचे १.२५ लाख डोस मिळाले आहेत. अशी माहिती राज्याचे रोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ट्वीट करत दिली आहे. दरम्यान राज्याला केंद्रीय कोट्यातून कोव्हॅक्सिनचे एकूण १२,९१,२८० डोस मिळाले आहेत. तर थेट खरेदी अंतर्गत एकूण १,४४,१७० कोव्हॅक्सिन डोस प्राप्त झाले आहेत.
सोमवारी, राज्याने खासगी रुग्णालयांना ४५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना दुसरा डोस देण्यासाठी कोव्हॅक्सिनच्या उपलब्ध साठ्याचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) जावेद अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, सद्य परिस्थितीत राज्याला कोव्हॅक्सिनचा कमी पुरवठा होत आहे.