बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई प्रशासनाने मंगळवारी शासकीय कार्यक्रमादरम्यान भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह देण्याच्या प्रथेवर बंदी घातली आहे. त्याऐवजी पर्याय म्हणून कन्नड पुस्तके देता येतील, असे म्हंटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आदेशानंतर मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी याबाबत एक परिपत्रक जारी केले.
दरम्यान, बोम्माई यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीत पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याला “अनावश्यक खर्च” असे म्हटले. प्रोटोकॉलच्या नावाखाली भेटवस्तू देण्याची प्रथा बंद केली पाहिजे असे ते म्हणाले.
त्यानुसार, मुख्य सचिव कुमार यांनी परिपत्रक सर्व विभाग प्रमुखांना पाठवून सरकारी उपक्रमांना मुख्यमंत्री बोम्माई यांच्या सूचनेचे न चुकता पालन करण्यास सांगितले. कुमार यांनी सांगितले की, “याद्वारे असे निर्देश देण्यात आले आहेत की राज्य सरकार आणि सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आणि बैठकांमध्ये कोणत्याही प्रकारची भेटवस्तू, पुष्पगुच्छ, हार, फळांच्या टोपल्या, शाल आणि स्मृतीचिन्हे देऊ नयेत.”
६ ऑगस्ट रोजी त्यांनी शपथ घेतल्यानंतर ऊर्जा आणि कन्नड आणि संस्कृती मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी लोकांना भेटवस्तू देऊ नका असे आवाहन केले. त्यांनी कन्नड पुस्तके मागितली जी ते त्यांच्या मतदारसंघातील ग्रंथालयाला देऊ शकतील. त्याला प्रतिसादात म्ह्णून शेकडो पुस्तके मिळाल्याचे सांगितले आहे.