कर्नाटकचे जलस्रोतमंत्री रमेश जारकीहोळी यांचा दावा
प्रतिनिधी / पणजी
म्हादईचे पाणी वळवले म्हणून गोवा सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर कर्नाटकातून पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून तेथील जलस्रोतमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पाणी बेकायदेशीरपणे वळविल्याचा इन्कार केला आहे. म्हादई पाणी तंटा लवादाच्या निकालानुसार कर्नाटक राज्याला जो पाण्याचा वाटा देण्यात आला आहे तेवढेच पाणी वळवण्यात आले असून ते कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गोव्याने दाखल केलेल्या अवमान याचिकेला योग्य ते प्रत्युत्तर देऊ असे निवेदन त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना केले. त्यांनी कर्नाटक राज्याच्या कायदेशीर टीमबरोबर चर्चा केली असून पुढील रणनिती ठरविण्याचे काम चालू केले आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी म्हादई प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दर्शवला असून हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून बोलण्याचे टाळले आहे.









