बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याआधी कर्नाटक सरकारने बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. तसेच प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तींना ५ हजार ही देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. आता कर्नाटक सरकार, एचसीजी हॉस्पिटल आणि कोविड इंडिया कॅम्पेन यांच्या भागीदारीत एचसीजी हॉस्पिटलने राज्यात पहिली प्लाझ्मा बँक सुरू केली आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर आणि खासदार तेजस्वी सूर्य यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री डॉ.सी.एन. अश्वथनारायण यांच्या हस्ते मंगळवारी या प्लाझ्मा बँकेचे उद्घाटन झाले. त्यानंतर कोरोनाला पराभूत करणार्या तीन रुग्णांनी प्लाझ्मा दान केला. प्लाझ्मा थेरपी कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे. कोरोनातून बरे झालेले लोक इथे प्लाझ्मा दान करून इतरांना जीवनदान देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. बँक उघडल्यामुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर उपचारांना वेग येणार आहे.
एचसीजी ग्लोबलचे प्रादेशिक संचालक आणि ओरल कॅन्सर पॅथॉलॉजिस्ट डॉ विशाल राव यांनी सांगितले की देशात चार ते पाच प्लाझ्मा बँका आहेत. पहिली बँक नवी दिल्लीत सुरू झाली. कोरोनापासून बरे झालेल्यांमध्ये, एक अँटीबॉडी विकसित होतात ज्या कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यास सक्षम आहेत. रक्तातील अँटीबॉडी काढून रुग्णांवर उपचार केले जातात. क्लिनिकल ट्रायल्समधील प्लाझ्मा थेरपीचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. विशेषत: कोविडच्या गंभीर रूग्णांसाठी.
कोरोनातून मुक्त झालेल्या पूर्वीच्या रुग्णांना मानवता म्हणून प्लाझ्मा प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ विशाल राव यांनी केले आहे. आतापर्यंत एकूण १५ लोकांनी प्लाझ्मा दान केले आहे. नऊ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी झाली. कोरोनाहून परत आलेल्या इतर २० जणांनी या चॅरिटीसाठी नोंदणी केली आहे.









