सलग पाचव्या दिवशी पोळे चेकनाक्यावर गर्दी : पास – आवश्यक दस्तऐवज असलेल्यांनाच प्रवेश

प्रतिनिधी / काणकोण
गोव्यात विविध ठिकाणी कामांसाठी आलेल्या कर्नाटकातील कामगार आणि अन्य नागरिकांनी आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी पाचव्या दिवशी देखील पोळे चेकनाक्यावर एकच गर्दी केली. कर्नाटकातील भटकळ आणि दावणगिरी हे भाग वगळता बाकीच्या हिरव्या विभागात जाण्यासाठी पोळे चेकनाक्यावरून परवानी दिली जात असून कर्नाटकातील माजाळी चेकनाक्यावर या नागरिकांना नेण्यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.
एवढेच नव्हे, तर या नागरिकांच्या भोजनाची सोय देखील करण्यात आली असून पोळे चेकनाक्यावर सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर जेव्हा हे नागरिक माजाळी चेकनाक्यावर प्रवेश करतात तेव्हा प्रत्येकाच्या हातात जेवणाची पाकिटे दिली जातात. कारवारच्या उपजिल्हाधिकारी प्रियंगा एम. या माजाळी चेकनाक्यावर उपस्थित राहून या सर्व गोष्टींची शहानिशा करत आहेत. ज्या नागरिकांजवळ पासेस आणि अन्य आवश्यक दस्तऐवज आहेत त्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. गोव्याच्या सीमेवरील नाक्यावर तैनात करण्यात आलेले विशेष अधिकारी, उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, मामलेदार विमोद दलाल, पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. 10 रोजी सकाळी 25 पेक्षा अधिक वाहनांतून कर्नाटकातील नागरिक आपआपल्या गावात जाण्यासाठी आले होते. या सर्व वाहनांत मिळून 700 ते 800 नागरिक असावेत, अशी माहिती या भागात नियंत्रण ठेवत असलेल्या पोलिसांनी दिली. पोळे येथे 9 रोजी आलेल्या नागरिकांचे सोपस्कार पूर्ण करेपर्यंत बरीच रात्र उलटली. त्यामुळे पोळे चेकनाक्यावर गर्दी टाळण्यासाठी सर्व वाहने चार रस्ता येथील मनोहर पर्रीकर बगलमार्ग आणि त्यानंतर माड्डीतळप येथे थांबवून ठेवण्यात आली. या सर्व गोष्टींवर उकाडय़ाची पर्वा न करता 24 तास नियंत्रण ठेवण्याचे काम काणकोणचे पोलीस करत आहेत.









