बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी.आर. श्रीरामुलू यांना शिवाजीनगर येथील सरकारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नियमानुसार, ते कमीतकमी एका आठवड्यासाठी घरी स्वतंत्र राहणार आहेत.
श्रीरामुलू यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्या नंतर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांनी उपचाराच्या सुविधांसहित उपचाराधीन रूग्णांची माहिती मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांशी एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टर आणि परिचारिका यांच्यामुळेच आज त्यांना कोरोनाला पराभूत करण्यात यश आले असल्याचे ते म्हणाले. तसेच सहकार्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अन्य मंत्र्यांचे आभार मानले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर ९ ऑगस्टला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनावर सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे ते राज्याचे पहिले मंत्री आहेत. त्यांनी ट्विटद्वारे स्वत: च्या संसर्गाबद्दल आणि सरकारी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली होती. तापात फ्लूसारखी लक्षणे दिसू लागताच त्याची कोरोना तपासणी केल्यांनतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.









