बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीने कोविड लस उत्पादकांकडून थेट लस खरेदी करण्याची परवानगी मिळावी यासाठी सरकार पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी ‘कॉग्रेसला लस द्या’ नावाची ऑनलाईन मोहीम मंगळवारी सुरू केली.
दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार म्हणाले, “उत्पादकांकडून थेट लस घेण्याची आणि त्यांना कर्नाटकातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही १०० कोटींच्या योजनेवर आग्रही आहोत. आम्हाला परवानगी मिळावी म्हणून वारंवार सरकारकडे विनंती करत आहे. पण सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. “
शिवकुमार म्हणाले की, सरकारची मंजुरी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना ऑनलाईन मोहीम राबविण्याचा आग्रह केला आहे. ते म्हणाले, “सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि लोकांना पारदर्शक, निष्पक्ष आणि कार्यक्षम पद्धतीने लस कशी दिली जाऊ शकते हे त्यांना दर्शविण्यासाठी आम्हाला आपला मनापासून पाठिंबा पाहिजे.”