बेंगळूर/प्रतिनिधी
पंजाबमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान कर्नाटक सरकारने पंजाबमधील कोविड -१९ प्रकरणांच्या वाढीचा हवाला देऊन सोमवारी एक आदेश जारी केला असून उत्तर राज्यातून प्रवेशकरणाऱ्यांना नकारात्मक आरटी-पीसीआर कोविड चाचणी अहवाल सादर करणे अनिवार्य केले आहे.
यापूर्वी केवळ शेजारच्या महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या लोकांनाच हा अहवाल देणे आवश्यक होते. दरम्यान पंजाबमधून येणाऱ्या प्रवाशांचा कोरोना अहवाल घेण्याचा निर्णय कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या शिफारशींवर आधारित आहे, असे आदेशात स्पष्ट केले.
आदेशानुसार, या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाश्यांनी कर्नाटकमध्ये येताना आरटी-पीसीआर नकारात्मक प्रमाणपत्र सादर केले पाहिजे जे २४ तासापेक्षा जुने नसावे. अपर मुख्य सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण), जावेद अख्तर यांनी स्पष्टीकरणदेताना, उड्डाण, बस, ट्रेन आणि वैयक्तिक वाहतुकीद्वारे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांना आणि महाराष्ट्र, केरळ, पंजाब आणि चंदीगडमध्ये जाणाऱ्या सर्व उड्डाणांसाठी हा आदेश लागू आहे.









