बेंगळूर/प्रतिनिधी
सीरा आणि राजराजेश्वरी नगर (आरआर नगर) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. माजी मंत्री टी. बी. जयचंद्र तुमकूर जिल्ह्यातील सीरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर दिवंगत आयएएस अधिकारी डी. के. रवी यांची पत्नी एच. कुसुम बेंगळूररूमधील आरआर नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यासाठी ९ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर असणार आहे.
यावर्षी ऑगस्टमध्ये जद (एस) चे आमदार बी. सत्यनारायण यांच्या निधनानंतर सीरा मतदार संघातील जागा रिक्त झाली होती तर राजराजेश्वरी नगरचे कॉंग्रेसचे आमदार एन. मुनिरथना यांना अपात्र ठरविण्यात आल्याने या मतदार संघातील जागा रिक्त होती. या दोन्ही जागांसाठी आता नोव्हेंबर मध्ये मतदान होणार आहे.









