ऑनलाईन टीम / गाजियाबाद :
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मधील सटे मोदीनगरच्या नोडल अधिकारी सौम्या पांड्ये यांनी 15 दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर दोन आठवड्यांच्या बाळाला घेऊन सौम्या यांनी पुन्हा एकदा कार्यालयात हजेरी लावली. या कोरोनाच्या काळात देखील सौम्या यांनी हा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे देशभरात कौतुक केले जात आहे.
उपविभागीय दंडाधिकारी असलेल्या सौम्या या सात महिन्यांच्या गरोदर असताना जुलै महिन्यात त्यांना कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये गाजियाबाद मध्ये जिल्ह्याच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
सौम्या यांना नियमानुसार, मॅटर्निटी लिव्ह म्हणजेच गरोदर महिलांना देण्यात येणारी सुट्टीची मुभा होती. मात्र, त्यांनी सुट्टी न घेता आपली कामे चालूच ठेवली. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आणि अवघ्या 14 दिवसानंतर आपल्या लहान मुलीला घेऊन कामावर रुजू झाल्या आहेत.
कामावर रुजू झाल्यावर आपली प्रतिक्रिया देताना सौम्या म्हणाल्या, परिवारासोबत च आपला देश देखील महत्वाचा आहे. या कोरोना सारख्या संकट काळात डॉक्टर, नर्स आणि अनेक लोकं अथक परिश्रम करत आहेत. अशा वेळी मी स्वतः च्या कर्तव्यापासून दूर राहणे चुकीचे आहे. त्यामुळे मी 22 दिवसांची सुट्टी घेतली आणि आता बाळाला जन्म दिल्यावर दोन आठवड्यांनी कामावर रुजू झाले आहे.