नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपालसह अन्य सात सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये साहाय्यक स्टाफमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. बेंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये सरावासाठी भारतीय महिला हॉकी संघ दाखल झाला आहे.
बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये हॉकीच्या सरावासाठी भारतीय महिला हॉकी संघातील हॉकीपटू आपल्या विविध राज्यांतून दाखल झाल्या होत्या. भारतीय महिला हॉकीपटूंची 24 एप्रिल रोजी कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीत कर्णधार रानी रामपाल, गोलरक्षक सविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, नवनीत कौर आणि सुशिला यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे या संघाबरोबरच्या साहाय्यक वर्गातील अमृतप्रकाश आणि शास्त्राrय सल्लागार वेनी लोंबार्ड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व कोरोना बाधितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय इलाज चालू आहे.









