वृत्तसंस्था/ केपटाऊन
पाकचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर आहे. उभय संघातील झालेल्या वनडे मालिकेत पाकने दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला. आता या मालिकेनंतर उभय संघात होणाऱया चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. बवुमाची उणीव दक्षिण आफ्रिकन संघाला या मालिकेत चांगलीच जाणवेल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच टेम्बा बवुमाकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. गेल्या बुधवारी प्रेटोरिया येथे झालेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळताना बवुमाला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तो टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने सांगितले. शनिवारी दक्षिण आफ्रिका आणि पाक यांच्यात पहिला टी-20 सामना जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. बवुमाच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद क्लासेनकडे सोपविण्यात आले आहे.









