भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे प्रतिपादन, एका मालिका पराभवामुळे चिंतेचे कारण नसल्याचा दावा
मस्कत / वृत्तसंस्था
कसोटी क्रिकेटमध्ये 68 सामन्यात 40 विजय संपादन करुन देणारा विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून निवृत्त झाला असला तरी आयसीसी वर्ल्डकप जिंकून देता न आल्याबद्दल तो टीकेचा धनी ठरत आला आहे. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र कोणत्याही कर्णधाराची उंची वर्ल्डकप जिंकण्याच्या निकषावरुन मोजू नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
‘आपल्याकडे वर्ल्डकप जिंकणारे किती कर्णधार आहेत, याचा प्रथम विचार करा. सचिनला त्याच्या कारकिर्दीत सहाव्या प्रयत्नात वर्ल्डकप जिंकता आला. सौरभ गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे एकदाही वर्ल्डकप जिंकू शकले नाहीत. वर्ल्डकप जिंकणे हे कोणी ठरवून होत नसते’, असे शास्त्री याप्रसंगी म्हणाले.
‘प्रत्येक खेळाडू कसा खेळतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. खेळाप्रती तळमळ, बांधिलकी, त्याच्या कारकिर्दीची व्यापकता अशा बाबींवर खेळाडूला मोजले गेले तर ते रास्त ठरते’, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.
मागील सलग 7 वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारताला जेतेपदापासून सातत्याने वंचित रहावे लागले असून युएईमधील शेवटचा टी-20 वर्ल्डकप हा या मालिकेतील सातवा ठरला. भारताला यापूर्वी 2014 टी-20 वर्ल्डकप फायनल, 2015 वनडे वर्ल्डकप सेमीफायनल, 2016 टी-20 वर्ल्डकप सेमीफायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्डकप सेमीफायनल व 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताला सलग पराभव पत्करावे लागले. पण, अशा निकषावरुन कर्णधाराचे योगदान मोजू नये, असे शास्त्री यांचे मत आहे.
केवळ एकाच मालिकापराभवाने संघ वाईट ठरत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. विराट कोहली सर्व क्रिकेट प्रकारातून कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर हंगामी कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत 0-3 असा व्हॉईटवॉश झेलावा लागला. त्यापूर्वी 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या 2 लढतीत वांडरर्स व केपटाऊन येथेही भारतीय संघाची धुळधाण उडाली होती. या पार्श्वभूमीवर शास्त्री बोलत होते.
‘अगदी एक मालिका गमावली तरी टीका सुरु होते. संघ प्रत्येक सामना जिंकू शकत नाही. विजय, पराभव असणारच. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अगदी एकही चेंडू मी पाहू शकलो नाही. पण, मागील 5 वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी साकारणाऱया संघाने एक मालिका गमावली म्हणून आगपाखड करण्याचे कारण नाही’, असे ते म्हणाले. कसोटी नेतृत्वाचा राजीनामा देणे हा विराटचा स्वतःचा निर्णय आहे आणि त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा. फलंदाजीवर किंवा क्रिकेटवर लक्ष पेंद्रित करण्यासाठी यापूर्वीही सचिन, सुनील गावसकर, धोनी यांनी नेतृत्व सोडणे पसंत केले होते. त्यात आता विराट समाविष्ट झाला आहे, असे ते म्हणाले.
बॉक्स
चिंता करावी प्रतिस्पर्ध्यांनी!
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्डकप होत असून त्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघ कॅलेंडर वर्षातील पहिल्या टप्प्यात विंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये संघ विजयाच्या ट्रकवर परतेल, अशी आशा शास्त्री यांनी व्यक्त केली. मागील 5 वर्षांच्या कालावधीत भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 65 इतकी आहे. त्यामुळे, आपण चिंता करण्याचे कारण नाही, चिंता प्रतिस्पर्ध्यांनी करावी, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.
बॉक्स
शास्त्री पुन्हा समालोचनाकडे वळणार
मुख्य प्रशिक्षकपदाची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर शास्त्री सध्या लिजेंड लीग क्रिकेटमध्ये आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध स्थगित केली गेलेली कसोटी खेळेल, त्यावेळी ते समालोचनात पुनरागमन करतील, असे संकेत आहेत. लिजेंड लीग क्रिकेटला उत्तम प्रतिसाद मिळत असून पुढील हंगामात एबी डीव्हिलियर्स, ख्रिस गेल, डॅनिएल व्हेटोरीसारखे खेळाडू येथे खेळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारुन 6 महिने पूर्ण झाल्यानंतर खेळाडू लिजेंड लीगमध्ये खेळू शकतात, अशी स्पर्धेची रचना आहे.
बॉक्स
मागील 7 वर्ल्डकपमधील भारताची कामगिरी व कर्णधार
वर्ल्डकप / भारताची कामगिरी / स्पर्धेतील भारतीय कर्णधार
2014 टी-20 वर्ल्डकप / श्रीलंकेविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत / एमएस धोनी
2015 वनडे वर्ल्डकप / ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत / एमएस धोनी
2016 टी-20 वर्ल्डकप / विंडीजविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत / एमएस धोनी
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी / पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत / विराट कोहली
2019 वनडे वर्ल्डकप / न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत / विराट कोहली
2021 कसोटी चॅम्पियनशिप / न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत / विराट कोहली
2021 टी-20 वर्ल्डकप / साखळी फेरीत आव्हान संपुष्टात / विराट कोहली
बॉक्स
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे कर्णधार
वर्ष / विश्वचषक स्पर्धा / भारतीय कर्णधार
1983 / वनडे वर्ल्डकपमध्ये जेतेपद / कपिलदेव
2007 / टी-20 वर्ल्डकपमध्ये जेतेपद / एमएस धोनी
2011 / वनडे वर्ल्डकपमध्ये जेतेपद / एमएस धोनी









