सहकार खात्याचे जॉईंट रजिस्ट्रार जी. एम. पाटील यांची अर्बन बँकेला भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्जवसुली चांगली असेल आणि थकबाकी जास्त नसेल तरच बँकांची प्रगती चांगली होते. त्यामुळे कर्ज देताना चांगले कर्जदार शोधूनच कर्ज द्या. म्हणजे बँक प्रगतिपथावर नेण्यासाठी मदत होईल, असे विचार बेळगाव विभागाचे सहकार खात्याचे जॉईंट रजिस्ट्रार जी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.
सोमवारी बेळगाव पायोनिअर अर्बन बँकेला जी. एम. पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्या बँकेने 90 कोटींच्या ठेवी आणि 65 कोटींची कर्जे वितरीत करण्याचा टप्पा गाठला आहे. ही चांगली गोष्ट आहे. बेळगाव जिल्हय़ामध्ये 6 हजार सहकारी संस्था आहेत. त्यापैकी केवळ 8-10 संस्था अडचणीत आल्या. त्यामुळे बाकीच्यांनाही अडचण निर्माण झाली. संस्थेचे संचालक हे संस्थेचे विश्वस्त असतात. त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून काम केले पाहिजे आणि लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. सहकार खाते हे सहकारी संस्थांचे मित्र, सल्लागार आणि मार्गदर्शक असतात. या भावनेतूनच आम्ही काम करतो, असे सांगताना 100 वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेची आपल्या संचालक मंडळाच्या पारदर्शक कार्यामुळे जी प्रगती होत आहे ती कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. नवे संचालक मंडळ आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत बँकेच्या ठेवीत सुमारे 10 कोटींची वाढ झाली असून 15 कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत बँकेची उल्लेखनीय प्रगती झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन रणजीत चव्हाण-पाटील, संचालक अनंत लाड यांचीही भाषणे झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप जोशी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे संचालक रमेश शिंदे, ग. मा. पाटील, शिवराज पाटील, मारुती शिगीहळ्ळी, रवी दोड्डण्णावर, सुहास तरळे, विद्याधर कुरणे, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर उपस्थित होते. प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते जी. एम. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.









