सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती : 10 लाखांपर्यंतचे गृहकर्ज सोसायटय़ांमार्फत!
प्रतिनिधी / कणकवली:
सोसायटय़ांमार्फत खावटी कर्ज घेतलेले सभासद मोठय़ा प्रमाणात थकबाकीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत माफी दिलेल्या कर्जाला जुलै 2017 पर्यंतच्या व्याजालाच माफी आहे. तसेच यात 7773 सभासद पात्र आहेत. तर 8362 अपात्र आहेत. सद्यस्थितीत त्यांना 14 टक्के दराने व्याज भरावे लागत असून त्यांनी कर्जफेड केल्यास त्यांना 1 सप्टेंबरपासून 9 टक्के दराने सोसायटय़ांमार्फत उचल देण्यात येईल. तसेच 10 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 15 हजारची स्टँपडय़ुटीतून सवलत मिळण्यासाठी हे कर्ज सोसायटय़ांमार्फत देण्यात येत आहे. त्यात 500 रुपयांच्या बाँडवर कर्ज दिले जात असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
येथील बँकेच्या शहर शाखेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते. खावटी कर्जमाफीबाबत कर्जदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. आपल्याकडे 7773 सभासदांची 12 कोटी 73 लाख एवढी रक्कम या कर्जमाफीत बसते, तर 8362 कर्जदारांची 18 कोटी 43 लाखांची रक्कम पात्र ठरत नाही. सद्यस्थितीत खावटी कर्जदारांकडून सोसायटय़ांनी वसुली सुरू केली आहे. त्यांना सद्यस्थितीत 14 टक्के व्याज भरावे लागत आहे. त्यांनी तातडीने कर्ज भरणा केल्यास त्यांना कर्ज देण्यासाठी बँकेकडून 7 टक्के दराने सोसायटय़ांना व सोसायटय़ांकडून 9 टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे. यात 5 टक्के व्याज आकारणी वाचणार आहे. तसेच खावटीला पात्र असलेल्यांनी भरले तरिही त्यांना माफीची रक्कम बँक अकाऊंटवरच मिळणार असल्याचे श्री. सावंत म्हणाले.
जिल्हय़ात सोसायटय़ांची दीड ते दोन हजार सभासद असून कर्जदार सभासद कमी आहेत. सातबारावर आणेवारी नसल्याने अडचण होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून सहहिस्सेदारांची संमत्ती नसली तरीही त्याच्या हिश्श्यापुरता बोजा चढविण्याची विनंती केली जाणार आहे. याअनुषंगाने व सभासद वारस तपासच्या अनुषंगाने मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले. शेतीकर्ज घेतलेल्या सभासदांना 2018-19 व 2019-20 च्या व्याज अनुदानाचे 6 कोटी रुपये केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त नाहीत. याबाबत सोसायटय़ांना काही मदत करता येईल का या अनुषंगाने संचालक मंडळाचा प्रयत्न असून चार दिवसांनी होणाऱया संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले. 10 लाखांपर्यंतच्या होमलोनसाठी मॉरगेजकरीता 15 हजार स्टँपडय़ुटी भरावी लागते. हे कर्ज सोसयटय़ांमार्फत दिले तर 500 रुपयांच्या बाँडपेपरवर होणार आहे. त्यामुळे याचाही लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन सावंत यांनी केले
राणेंकडे अनेक वाझे कार्यरत!
आरोप करणे हा आमदार नीतेश राणेंचा धंदा आहे. त्यांनी अगोदर स्वत:चे घर व कार्यकर्ते सांभाळावेत. त्यांनी जुन्या शिवसैनिकांना पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. आता भांडणे लावून काही होतेय का ते तपासत आहेत. मात्र, त्याचा फायदा त्यांना होणार नाही. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारही त्यांना नाही. किरण सामंत हे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असल्याने ते त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, 2014 पासून त्यांच्याकडे कार्यरत सचिन वाझे बरेचशे आहेत. प्रधानमंत्री, मुख्यमंत्रीसडक, जि. प. व काही नगरपंचायतीतही हे वाझे कार्यरत आहेत. तसेच काही त्यांच्याकडेही आहेत. त्याचा बंदोबस्त करावा. त्यांनी भाजपातील जुन्या लोकांना सांभाळावे. ते नाराज आहेत. मध्यप्रदेशमधून भाजपच्या वैभववाडी तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्याला फोन करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबातचे नाव आपण योग्यवेळी जाहीर करेन, असेही सावंत म्हणाले.









