15 जूनपासून ओपीडी होणार सुरू : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
प्रतिनिधी / वाळपई
राज्यात कर्करोग तपासणी सेवा उपलब्ध नसल्यामुळे ऊग्णांना मुंबई, मद्रास याठिकाणी उपचारासाठी जावे लागते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात कर्करोगावर उपचार करण्यासाठी खास निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून स्वतंत्र कर्करोग इस्पितळ बांधण्यात आले आहे. तपासणीसाठी टाटा मेमोरियल हॉस्पीटलशी करार केला आहे. कर्करोग इस्पितळाचे काम पूर्ण झाले असून येत्या जून 15 पासून कर्करोग ओपीडी सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
सत्तरी नगरगाव येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री राणे बोलत होते. व्यासपीठावर आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर, एएसीजीआय डॉ. शॉन, डॉ. शाम काणकोणकर, डॉ. जुड, डॉ. रीधिमा गावकर, डॉ. अभिजित वाडकर, डॉ. गीता देशमुख, संयोजक विनोद शिंदे, पंचायत सदस्य रामू खरवत, मामू खरवत, देवयानी गावकर, उर्मिला गावस, राजेंद्र अभ्यंकर, जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे, नगरगाव सरकारी माध्यमिक विद्यालयाचे देविदास कोटकर उपस्थित होते.
कर्नाटकपेक्षा गोव्यात आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. गोमंतकीयांना मोफत औषधे प्रदान करण्यात येतात. आधुनिक साधन सुविधा उपलब्ध करणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात आरोग्य सुविधा पुरविण्यास उत्तम सहकार्य केले असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
शहरी गतिशीलता हा नवीन प्रकार असला तरीसुद्धा यासाठी उपलब्ध होणारा निधी हा गोवेकरांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी वापरण्यात येणार आहे. सध्यातरी सत्तरी व मुरगाव हे दोन तालुके प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रामध्ये पेडियाट्रीक व गायनॉकॉलॉजी या दोन विभागांसाठी चार ऊग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मंत्री राणे म्हणाले.
ग्रामीण भागात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करून प्रत्येक गावातील ग्रामस्थांची तपासणी करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. देशात पहिल्यांदाच असा उपक्रम गोव्यात सुरू झाला आहे, असे डॉ. गीता काकोडकर यांनी सांगितले. सरपंच संध्या खाडिलकर यांनी विचार मांडले. डॉ. वैभव गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिजीत वाडकर यांनी आभार मानले.
परप्रांतीयांना मोफ्ढत आरोग्य सुविधा मिळणारच: मंत्री राणे
कर्नाटकातील एका भागामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो होतो. तेथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा तुटपुंज्या आहेत. सदर भागातील नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून कर्नाटकमधील लोक गोव्यात येत असतात. आपल्या राज्यात परप्रांतीयांना सुद्धा मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. परप्रांतीयांना मोफत सुविधा देणे हे सरकारचा निर्णय आहे. यामुळे कोणीही कितीही आरडाओरडा केली तरी परप्रांतियांना मोफत आरोग्य सुविधा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.








