रुग्णाला ताजे खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून धडपड
एका रेस्टॉरंटमधून जेवणाची ऑर्डर दिली, पण तुमच्या घरी ऑर्डर नव्हे तर त्या रेस्टॉरंटचा मालक स्वतः पोहोचला आणि तुमच्या घरातच त्याने ते खाद्यपदार्थ तयार केले तर काय वाटेल याची कल्पना करा. अमेरिकेतील एका रेस्टॉरंट मालकाने कर्करोगाची रुग्ण असलेल्या महिलेला स्वतःच्या रेस्टॉरंटमधील पसंतीचा खाद्यपदार्थ खावू घालण्यासाठी 850 किलोमीटरचे अंतर कापले आहे. या चांगल्या कृतीतून रेस्टॉरंट मालकाने लोकांची मने जिंकली आहेत.
अमेरिकेच्या वर्मोन्ट येथे ही घटना घडली आहे. तेथील एक महिला स्टेज-4 यकृताच्या कर्करोगाने पीडित आहे. तिला एशियाई रेस्टॉरंट ‘एकिबेन’ टेम्पुरा ब्रोकुली ही डिश अत्यंत पसंत असल्याने तिची मुलगी रीना आणि जावई ब्रँडन जोन्स यांनी बाल्टीमोर येथील एकिबेनमधून जेवण मागविण्याचा विचार केला, पण रेस्टॉरंट प्रचंड अंतरावर होते. सर्वसाधारणपणे इतक्या अंतरावर डिलिव्हरी केली जात नाही. याचमुळे त्यांनी रेस्टॉरंटला एक ईमेल पाठवून कर्करोग पीडित महिलेला हे खाद्यपदार्थ अत्यंत पसंत असून तुम्ही ते पाठवू शकता अशी विनंतीवजा विचारणा केली.
‘एकिबेन’ रेस्टॉरंटचे सह-संस्थापक स्टीव्ह चू यांना कर्करोगाच्या रुग्णाच्या या इच्छेविषयी कळल्यावर त्यांनी खाद्यपदार्थ पाठविण्याऐवजी तिच्या घरी जात तेथेच तो तयार करण्याचा निर्णय घेतला. याकरता स्टीव्ह यांनी सुमारे 850 किलोमीटरचे अंतर कापले आहेत.









