रुग्णांच्या मदतीसाठी संस्था वर्षभरापासून कार्यरत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. ऑक्सिजनच्या अपुऱया पुरवठय़ामुळे रुग्ण दगावण्याच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ही समस्या जाणून घेऊन करोशी येथील मुस्लीम सुन्नत जमातने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही संस्था अंजुमन ए इस्लाम या संस्थेच्या सहकार्याने कार्यरत आहे.
रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे, मृतदेहांवर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करणे, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे यासह अनेक कार्ये संस्था गेल्या वर्षभरापासून करत आहे. याशिवाय या संस्थेची मेडिकल टीम असून रुग्णांना घरीच योग्य उपचार देऊन बरे करण्यात येत आहे. अंजुमन इस्लाम या संस्थेप्रमाणेच या संस्थेचे कार्यदेखील वाखाणण्याजोगे आहे.
मुस्लीम सुन्नत जमात करोशी या संस्थेत माजिद पटेल, बापू पटेल जुबेर पटेल, सज्जात पटेल, इनामूल पटेल, शहानवाझ पटेल, वसीउल्लाह पटेल, कलिमुल्लाह पटेल, जुनेद पटेल, सोहेल जमादार, तन्वीर पटेल, इस्माईल पटेल, इम्रान पटेल, मुजम्मील मकानदार, मुस्तफा पटेल, अफसर पटेल, सालिक जमादार, इद्रिस पटेल, तय्यब काजी, सईद पटेल, जुबेर पटेल यांच्यासह अन्य सदस्य काम पाहतात. या कार्यात त्यांना अंजुमन ए इस्लाम बेळगावचे राजू सेठ, समीउल्ला माडीवाले आणि अश्पाक घोरी यांची मदत मिळते.









