वृत्तसंस्था / वुहान :
कोरोना विषाणूचे मुख्य केंद्र असलेल्या चीनमधील दुसऱया क्रमांकाची कंपनी टेनसेंटच्या नकळत झालेल्या डाटा लीकने या भयावह स्वरुप प्रकाशात आणले आहे. टेनसेंटनुसार कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 24 हजारांहुन अधिक जण मारले गेले आहेत. तर चीन सरकारने विषाणूमुळे आतापर्यंत केवळ 563 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
जगभरात वाद निर्माण झाल्यावर टेनसेंटने स्वतःची आकडेवारी बदलली आहे. पण नकळत झालेल्या या खुलाशामुळे चीनमधील कम्युनिस्ट पक्ष कोरोना विषाणूचे गांभीर्य जगभरापासून लपवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अनेक देशांमध्ये व्यवसाय करणारी चिनी कंपनी टेनसेंटने कोरोना विषाणूने 154023 जण ग्रस्त असून 24589 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले हाते. हा आकडा चीनच्या अधिकृत आकडय़ापेक्षा सुमारे 80 पट अधिक होता.
टेनसेंट कंपनीने दोन पद्धतींचा डाटा बाळगल्याचा कयास आहे. मृत तसेच प्रभावित लोकांचा खरा डाटा तसेच सरकारकडून मान्यताप्राप्त डाटा कंपनीने बाळगल्याची चर्चा आहे. टेनसेंटमधील कर्मचाऱयाने जाणूनबुजून हा आकडा जगासमोर आणून वस्तुस्थिती मांडल्याचीही वदंता आहे.
नुकसान लपविण्याचा प्रयत्न
वुहानमध्ये कोरोना विषाणूने ग्रस्त लोकांवर उपचार होत नसून ते रुग्णालयांच्या बाहेर मृत्युमुखी पडत आहेत. तपासणी उपकरणांच्या कमतरतेमुळे रुग्णांचा थांगपत्ता लावता येत नसल्याचे समजते. एखाद्याचा मृत्यू झाल्यास कोरोनाऐवजी अन्य आजाराचे कारण देण्याचा निर्देश डॉक्टरांना देण्यात आल्याचे वृत्त तैवान न्यूजने दिले आहे.
सत्य लपविण्याचे कृत्य
कोरोना संसर्गावरून कम्युनिस्ट पक्ष टीकेचा धनी झाला आहे. सत्य समोर आणणाऱया अधिकाऱयांच्या विरोधात सरकार कारवाई करत असल्याचा आरोप आहे. 28 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यातील बहुतांश जण वुहानचे नागरिक असल्याचे चीनने म्हटले आहे.









