प्रतिनिधी/ बेळगाव
करोना व्हायरसचे संकट बेळगावला येण्याची शक्मयता कमी आहे. तथापि खबरदारीचा उपाय म्हणून सिव्हिल हॉस्पिटलने त्याबाबत सर्व ती काळजी घेतली आहे. करोनासाठी स्वतंत्र ‘आयसोलेशन वॉर्ड’ सुरु करण्यात आला आहे. सध्या तरी या संकटाची छाया बेळगाववर सुदैवाने पडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, चीनमध्ये उद्भवलेले करोना व्हायरसचे संकट भारतात आले आहे. चीनच्या वूहान शहरातून भारतात परतलेल्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाली आहे. सध्या देशात करोनाची दोन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमिवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या शिवाय हॉस्पिटलच्या सर्व भिंती पाण्याने धुतल्या गेल्या आहेत. हॉस्पिटलमधील फरशी दररोज तीनवेळा औषध घालून पुसण्यात येत आहेत. एरव्हीसुध्दा हॉस्पिटलचा स्टाफ ग्लोव्हज आणि मास्क घालूनच काम करतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.
या संदर्भात पत्रके वाटण्यात येणार असून जनजागृतीही करण्यात येत आहे. चुकून जरी संशय आला तरी अशा रुग्णांच्या चाचण्या पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. सध्या सुदैवाने बेळगाव या संकटापासून दूर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेंही त्यांनी सांगितले.









