न्यायालयाच्या आदेशाने जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्याचा पेच सुटल्यामुळे यंदा रामनवमी प्रचंड उत्साहात साजरी झाली असती. पण देशभर व जगभर पसरलेल्या करोना महामारीने बंधने आली आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने शनिवार व रविवारी नव्वदच्या दशकातील सर्वच भारतीयांना खिळवून ठेवणारी रामायण ही मालिका दूरदर्शनवर पुनःप्रसारित करणे सुरू केल्याने लॉक डाऊनमुळे घरात कोंडून राहावे लागणाऱया आम आदमीला सुखद धक्का दिला आहे. दूरचित्रवाणीवर हल्ली शेकडो चॅनल्स असल्याने वाचकांना रामायण सहज पाहता यावे म्हणून विविध कंपनीचे चॅनल क्रमांक देत आहे. टाटा स्काय 114, डिश टीव्ही 193, एअर टेल 148, व्हिडिओकॉन 149, सन टीव्ही 310, डीडी फ्री डिश 1 वगैरे.
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या प्रभू रामाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस देशभरात दरवषी रामनवमी म्हणून साजरा करतात. संशोधक आणि काही प्रमाणे असे सांगतात की रामाचा जन्म इसवी सन पूर्व 5114 साली 10 जानेवारी रोजी झाला होता. याचा अर्थ असा की ते 5114 अधिक 2020 म्हणजे 7134 वर्षांपूर्वी प्रभुरामचंद्र जन्माला आले होते. हा शोध वाल्मीकी रामायणात उल्लेखित ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती आणि संपूर्ण भारतवर्षात सापडलेल्या पुरातात्विक अवशेषांच्या आधारावर करण्यात आला आहे. म्हणजे आज प्रभू रामचंद्रांची 7134 वी जयंती आहे.
भाजपच्या अजेंडय़ावर काश्मीरमधील 370 वे कलम हटवणे, रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधणे आणि देशात समान नागरी कायदा लागू करणे ही तीन आश्वासने जनसंघ असल्यापासूनच होती. या तिन्ही प्रश्नांचा संबंध मुस्लिमांशी येत असल्याने व काही पक्षांच्या मुस्लिम अनुनयामुळे भाजप वगळता इतर पक्षीय हे तिन्ही प्रश्न विलंबित ठेवण्यातच धन्यता मानत आले आहेत. भाजपाने मात्र 370 वे कलम हटवणे आणि आता रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याचे आश्वासन कायदेशीररीत्या पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलले असून अजून पूर्ण चार वर्षे हातात असल्याने समान नागरी कायदाही अमलात आल्याचे लवकरच पहावयास मिळेल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. शिवाय तीन तलाक बंदी कायदा आणून समान नागरी कायदा करण्याच्या मार्गाने वाटचालही सुरू केली आहे. जो काम करतो त्याच्याकडूनच अपेक्षा असल्याने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे व ‘एक देश एक निवडणूक’ या दोन कठीण गोष्टीही मोदीजी करतील अशीही त्यांच्याकडून अपेक्षा आहे.आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती अशा सर्वच आदर्शांचे प्रतीक असलेले प्रभुरामचंद्र पित्याने आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षे वनवासात राहिले. वनवास संपल्यावर अयोध्येत परत आल्यावर अयोध्यावासियांनी आनंदाप्रीत्यर्थ नगरी सजविली होती. नुकताच झालेला गुढीपाडवा या आनंदाप्रीत्यर्थ करोनाच्या साथीमुळे देशभर लॉक डाऊन असल्याने घरच्या घरी आपण सर्वांनी साजरा केला. 1528 मधे बाबर या परदेशी आक्रमकाने मंदिर पाडून मशीद बांधली त्याला 2028 मधे 500 वर्ष पूर्ण होतील. 80 टक्के हिंदू असलेल्या भारतात हिंदूंचे आस्था व श्रद्धास्थान असलेली रामजन्मभूमी मुक्त होऊ शकली नाही यापेक्षा दुर्दैवी घटना भारतासारख्या निधर्मी देशात कोणती असू शकते? देशातील जवळपास सर्वच रहिवाशांचे पूर्वज हिंदू होते यावर दुमत असण्याचे कारण नाही. आपल्या घटनेने सर्वच धर्मांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचा कायदेशीर अधिकार तर दिला आहेच, शिवाय धार्मिक अल्पसंख्याकांना विशेष अधिकार दिलेले आहेत. सुमारे 500 वर्षें मुघलांनी तर 150 वर्ष ब्रिटीशांनी देशावर राज्य केले. पैकी मुघल शासकांनी सक्तीचे धर्मांतर व हिंदूंच्या मंदिरांची मोडतोड केली होती हा इतिहास आहे. त्यापैकीच रामजन्मभूमी वाद ही एक घटना आहे. गेल्या वषी 9 नोव्हेंबरला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेली सत्तर वर्ष चालू असलेल्या रामजन्म भूमी वादावर एकमताने ‘रामाचा अयोध्येतच जन्म झाला होता व वादग्रस्त जागा ही रामजन्मभूमी आहे’ असा ऐतिहासिक निकाल दिला आणि सर्व देशभर आनंदाची लाट उसळली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारीला लोकसभेत केली. यावर लगेच कार्यवाही करण्यात आली असून 15 विश्वस्तांची नावे घोषित करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारी पर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते. या ट्रस्टमध्ये खालील 15 जणांचा समावेश आहे. 1. के. पराशरन (सुप्रीम कोर्टातील वकील) 2. आचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज) 3. जगतगुरु मध्वाचार्य स्वामी कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर) 4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार) 5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता) 6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज) 7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर) 8. कामेश्वर चौपाल (पाटणा) 9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा, अयोध्या) 10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य 11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य 12. केंद्राचा प्रतिनिधी 13. राज्याचा प्रतिनिधी 14. अयोध्येचे जिल्हाधिकारी 15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष 25 मार्चला श्रीराम जन्मभूमीतील रामलला हंगामी मंदिरात स्थलांतरित झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्लांना तंबूतून काढून खास बनवलेल्या तात्पुरत्या मंदिरातील चांदीच्या सिंहासनावर वैदिक मंत्रोच्चारांसह 25 मार्चला पहाटे पाचच्या सुमारास प्रभूरामचंद्राची स्थापना केली. रामलल्लांना हलवताना कोरोना साथीच्या संदर्भातील दक्षता घेण्यात आली होती. दरम्यान, ट्रस्टने 1 एप्रिल 2020 पासून नव्या आर्थिक वर्षात राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदारांकडून देणगी घेणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देणगीदारांना देणगी देता यावी म्हणून स्टेट बँकेच्या अयोध्या शाखेत नवीन खाते उघडले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना रामजन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतीय कार्यवाह डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, s ट्रस्टला देणगी देणाऱयांना दिलेल्या रकमेच्या 100 टक्के आयकर सूट मिळेल. त्याचप्रमाणे ट्रस्टने आयकर विभागाकडून नेहमीच्या 80 जी ऐवजी 35 एसी अंतर्गत सूट मिळवली आहे, ज्यामध्ये देणगीदारालाही आयकरात 100 टक्के सूट मिळेल. विविध संस्था, भक्त यांच्याकडून कोटय़वधीच्या देणग्या जाहीरही झाल्या आहेत. अवतारी पुरुष प्रभुरामचंद्र भारतासह सर्व जगालाच कोरोनाच्या मगरमिठीतून सहिसलामत सोडवतील अशी सर्व रामभक्तांची श्रद्धा आहे.
विलास पंढरी – 9860613872








