वृत्तसंस्था/ कँडी
कर्णधार दिमुथ करूणारत्ने आणि धनंजय डिसिल्वा यांनी नोंदवलेल्या शानदार अभेद्य त्रिशतकी भागिदारीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशला चोख प्रत्युत्तर देताना यजमान लंकेने पहिल्या डावात 3 बाद 512 धावा झळकविल्या. बांगलादेशने आपला पहिला डाव 7 बाद 541 धावांवर घोषित केला होता. ही कसोटी आता अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे. करूणारत्ने 234 तर धनंजय डिसिल्वा 154 धावांवर खेळत आहेत.
या कसोटीत लंकेने 3 बाद 229 धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. करूणारत्ने 85 धावांवर तर डिसिल्वा 36 धावांवर तिसऱया दिवसाअखेर खेळत होते. शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांना संपूर्ण दिवसात लंकेचे ही जोडी तोडता आली नाही. लंकेच्या या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी केली. करूणारत्नेने 419 चेंडूत 25 चौकारांसह 234 तर धनंजय डिसिल्वाने 278 चेंडूत 20 चौकारांसह 154 धावा झळकविल्या. लंकेने चौथ्या दिवशी 283 धावा जमविताना एकही गडी गमविला नाही. लंकेचा संघ अद्याप 23 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सात गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक- बांगलादेश प. डाव 7 बाद 541 डाव घोषित, लंका प. डाव 149 षटकांत 3 बाद 512 (करूणारत्ने खेळत आहे 234, धनंजय डिसिल्वा खेळत आहे 154, थिरिमने 58, ओ. फर्नांडो 20, मॅथ्यूज 25, टी. अहमद 1-91, मेहदी हसन 1-123, टी. इस्लाम 1-136).









