प्रतिनिधी / म्हापसा
करासवाडा म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्ग रुंदिकरणाच्यावेळी खोदकामावेळी जेसीबीद्वारे 1 हजार एमएलडीची वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. मंगळवारी महामार्ग रुंदिकरणासाठी करासवाडा येथे बांदेकर पेट्रोल पंपजवळ खोदकाम सुरू होते. खोदकामावेळी जेसीबीद्वारे एमव्हीआर या कंत्राटदार कंपनीकडून जलवाहिनी फुटली. ही 1 हजार एमएलडी क्षमतेची मुख्य जलवाहिनी असून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून बार्देश तालुक्यातील वेगवेगळय़ा बहुतेक भागांना पाणीपुरवठा केला जातो. हीच जलवाहिनी फुटल्याने तालुक्यातील पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला. पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी माहिती मिळताच त्यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणासाठी खोदकाम करताना एमव्हीआर इफ्रा या कंत्राटदार कंपनीकडून अनेकवेळा जलवाहिनी फोडली आहे. गेल्या दोन वर्षात कोलवाळ ते गिरी दरम्यानच्या पटय़ात वीसपेक्षा जास्तवेळा जलवाहिनी फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होऊन लोकांची गैरसोय झाली आहे.









