अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 11 जुलै 2021, सकाळी 11.00
● शनिवारी रात्री अहवालात 786 बाधित ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.65 ● नऊ तालुके दोन अंकी संख्येवर ● नऊ तालुक्यात निर्बंध कमी करा ● मुंबई-पुण्यात काय जादु झाली? ● जिल्ह्यात 2,482 बेड रिक्त
सातारा / प्रतिनिधी :
येणाऱ्या किंवा न येणाऱ्या तिसऱ्याला लाटेसाठी प्रशासन सज्ज असताना जिल्ह्यात अस्तित्वात असलेली दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. यामध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कराड सातारा दोन्ही तालुके हॉटस्पॉट ठरलेले आहेत तर इतर नऊ तालुक्यामध्ये बाधित वाढीची संख्या दोन अंकावर स्थिर आहे. यामुळे ज्या तालुक्यांमध्ये दोन अंकी संख्या आहे व वेग मंदावलेला आहे तिथे निर्बंध कमी करा, अशी मागणी नागरिक करत आहेत. कराड व सातारा शहर व तालुक्यांना सावरण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाने कंबर कसली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पॉझिटिव्हिटी दर खाली घसरला
दरम्यान, शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 786 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी दर 6.65 एवढा कमी राहिलेला असून यात 11,842 जणांच्या तपासण्या झालेले आहेत. यामध्ये 7,815 जणांच्या रॅपिड एंटीजन टेस्ट झालेले असून यामध्ये 522 जणांचे अहवाल बाधित आहे तर 4,027 जणांचा rt-pcr टेस्ट झालेली असून यामध्ये 265 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामुळे rt-pcr टेस्टिंग मधला पॉझिटिव्हिटी दर खाली घसरला असून तो 6.58 एवढा आहे. सध्या जिल्ह्यात दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्ण 1,995 असून एकूण 4,837 बेड पैकी 2892 बेड रिक्त आहेत.
बळींची संख्या कमी पण मृत्यूसत्र सुरूच
कोरोना बाधित होणे आता फारसे भीतीदायक राहिलेले नाही. त्यामुळेच मग निर्बंध उठवले की गर्दी होतेच. मात्र यामध्ये अद्यापही ज्या पद्धतीने बाधितांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे भितीचा पगडा कसा कायम आहे. गेल्या काही दिवसात 40 ते 50 वर असलेली बळींची संख्या 20, 30 अशी येऊ लागले आहे. मृत्यूदर घटत असला तरी दैनंदिन मृत्यूसत्र कमी संख्येने का होईना पण सुरू होत असल्याने हे कमी करण्याचे आव्हान अद्यापही आरोग्य विभागाला पेललेले नाही.
मुंबई-पुण्यात काय जादु झाली?
गेल्या दोन आठवड्यापासून कार्पोरेट सिटी असलेल्या आणि कोरोनाने प्रचंड थैमान घातलेल्या मुंबई-पुण्यात बाधित वाढीचा वेग सातारा जिल्हा पेक्षा कमी आहे. तर तिथे मृत्यूदर ही प्रचंड प्रमाणात घटलेला आहे. अत्यंत दाट किचकट वस्ती असलेल्या धारावी झोपडपट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून एक सुद्धा नवीन बाधित समोर नाही. मात्र इकडे सातारा जिल्ह्यात हजाराच्या पटीत होणारी वाढ अचंबित करणारीअसून मुंबई-पुण्यात नेमकी काय जादू झाली, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडलेला आहे.
खरंच ‘कृष्णा’ची निवडणूक बाधली का?
पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात नंतर बाधित वाढ प्रचंड प्रमाणात घटली होती. त्यानंतर सातारा तालुका हॉटस्पॉट ठरला होता. मात्र दुसऱ्या लाटेत सातारा कराड दोन्ही तालुके हॉटस्पॉट ठरलेले आहेत. सध्या सातारा तालुक्यात वेग कमी आलेला आहे मात्र ज्या पद्धतीने कराड तालुक्यात वाढ सुरू आहे त्याला खरंच कृष्णा कारखान्याची निवडणूक बाधली आहे का? याचा ई सर्वे होण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने बाधित वाढ होत आहे ती कारखान्याच्या निवडणुकीच्या गर्दीतच झालेली आहे का? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा म्हणजे यापुढे निवडणुकांना परमिशन देताना विचार करावा लागेल. मग उच्च न्यायालयाने निवडणुकीला परवानगी दिली होती, असे जिल्हाधिकारी यांच्या सांगण्याला काहीच अर्थ नाही. उच्च न्यायालय काही कोरोनावर मात करण्यासाठी फिल्डवर काम करत नाही आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला साथरोग नियंत्रण कायदा लागू नाही काय ? असे सवाल निर्माण होऊ शकतात.
माणसांचे जगणे सुसह्य करावे लागेल
जेव्हा एखादी साथ येते ती समूहामध्ये पसरण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मोठी मनुष्यहानी होण्याची भीती असते त्या वेळी साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात येतो. मात्र गेल्या दीड वर्षात ज्या पद्धतीने कोरोना बाबत परदेशातून अफवा येत होत्या तशा पद्धतीने काही घडलेले नाही. जे काय घडले आहे त्यामध्ये खूप सारा रोल आरोग्य विभागाचा आहे. कारण ज्या कोरोना वर काही उपचारच नव्हते. त्यावर जी औषधे वापरण्यात येत होती, इंजेक्शन वापरण्यात आली, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला हे समोर आलेले आहे. या औषधांना आता जागतिक आरोग्य संघटनेने बंद केलेले आहे. आत्ता देखील कोरोना वर ठोस असे कोणतेही औषध नाही. तरी रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. लसीकरण एवढाच एक पर्याय हातात आहे मात्र लसीकरण देखील कासवाच्या गतीने चाललेले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. नुसता कडक लॉकडाऊन हा काही एकमेव उपाय नाही. हे सिद्ध होऊनही निर्बंध लादले तर लोकांचा प्रक्षोभ वाढेल. जिल्हावासियांच्या प्रातिनिधिक भावना जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रशासनाने कधीतरी वाचाव्यात.
शनिवारी जिल्ह्यात बाधित 872, मुक्त 1,008, मृत 20
शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 11,67,836, एकूण बाधित 2,02,426, एकूण कोरूनामुक्त 1,89,059, मृत्यू 4,888 उपचारार्थ रुग्ण 9,298